11 जुलै रोजी बीडमध्ये मराठा समाजाची शांतता रॅली

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या शांतता रॅलीचे आयोजन मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये या रॅलीचे आयोजन 11 जुलै रोजी होणार आहे. ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत निघणार आहे. या रॅलीमध्ये बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मराठा समाज बांधव येणार आहे. मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी इतर समाजानेही या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी सूर्या लॉन्स बीड येथे झालेल्या मराठा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीत करण्यात आले आहे . या रॅलीसाठी ॲम्बुलन्स, पाणी वाटप व्यवस्था, अल्पोपहार, गाड्यांची पार्किंग व्यवस्था व इतर नियोजनासाठी रविवारी मराठा समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. सध्या काही घटक मराठा समाज व ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. मराठा समाज व ओबीसी समाजामध्ये गाव स्तरावर कोणतेही मतभेद नाहीत. मराठा समाज बांधव, मुस्लिम समाज बांधव, बारा बलुतेदार व गाव खेड्यातील अठरापगड जातींचा समुदाय सर्वजण महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत. समाजकंटक असे विघातक कृत्य करत आहेत. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी मराठा बांधवांच्या वतीने 11 जुलै, 2024 रोजी शांतता रॅली निघणार आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर या रॅलीला संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील संबोधित करणार आहेत.यानंतर या रॅलीचा समारोप होणार आहे.

Leave a Comment